मोहोळ तालुक्यातील १,७१९ शेतकऱ्यांना १९ कोटी ७७ लाखांची कर्जमाफी
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत मोहोळ तालुक्यातील १,७१९ शेतकऱ्यांना तब्बल १९ कोटी ७७ लाख २६ हजार रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने बँक खात्याची केवायसी करून घेण्याचे आवाहन मोहोळ येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक जी. टी. वडेकर यांनी केले आहे.
३० सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी बँक ऑफ इंडियाचे ४६४ असून, सर्वात कमी लाभार्थी आयसीआयसीआय बँकेचा केवळ एक शेतकरी आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने तालुक्यात सहा पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी विविध बँका तसेच महा-ई-सेवा केंद्रांना भेटी देऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर मोठे डिजिटल फलकही लावण्यात आले आहेत.
दरम्यान, कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याचे वडेकर यांनी सांगितले.
“कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी. फार्मर आयडी काढून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण करताना काही अडचण आल्यास संबंधित पालक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,” असे आवाहन सहाय्यक निबंधक जी. टी. वडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment