ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम वेगाने प्रगतीपथावर
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- पंढरपूर शहराचे सौंदर्य आणि ऐतिहासिक यमाई तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येत असलेल्या ९.९ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी करण्यात आली.
पंढरपूर नगरपरिषदेअंतर्गत ‘पंढरपूर शहर भुयारी गटार योजना टप्पा क्र. ४’ या १२२ कोटी रुपये मूळ किमतीच्या योजनेअंतर्गत यमाई तलाव परिसरात हे अत्याधुनिक सिव्हेज पंपिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याला आळा बसणार असून यमाई तलाव प्रदूषणमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.
यमाई तलाव परिसरात नागरिकांसाठी आकर्षक ‘यमाई वॉकिंग ट्रॅक’ उभारण्यात आला आहे. येथे दररोज सकाळी आणि सायंकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात. मात्र, तलावाच्या दक्षिण बाजूस असलेल्या टाकळी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने आणि परिसराचा नैसर्गिक उतार तलावाच्या दिशेने असल्याने घरगुती सांडपाणी थेट तलावात मिसळत होते.
यामुळे तलावातील पाणी दूषित होणे, दुर्गंधी निर्माण होणे, जलचरांचा मृत्यू तसेच परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
या पंपिंग स्टेशनमध्ये टाकळी ग्रामपंचायतीचे सांडपाणी, पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील माळी वस्ती, राऊत मळा तसेच मलपे नाला येथील सिव्हेज पंपिंग स्टेशनमधून येणारे सांडपाणी एका मोठ्या विहिरीमध्ये जमा केले जाणार आहे. त्यानंतर हे सांडपाणी पंपिंग करून योजनेअंतर्गत प्रस्तावित १३ एमएलडी क्षमतेच्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटकडे पाठवण्यात येईल. पुढे ते गोपाळपूर येथील मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर यमाई तलावात येणारे सांडपाणी पूर्णपणे बंद होऊन तलावाचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखले जाणार आहे. सध्या कामाची प्रगती समाधानकारक असून काम वेगाने सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात येईल, असा विश्वास पाहणीप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते भागवत बडवे, नगरसेवक अमोल डोके, अॅड. सुनील वाळुजकर, युवक नेते प्रणव परिचारक, पंचायत समिती सभापती शुभम आगावणे, लक्ष्मी टाकळीचे सरपंच औदुंबर ढोणे, सागर कारंडे, नगरसेवक सौरभ थिटे, शरद माने, धर्मराज घोडके, अशोक शिंदे, गणेश शिंदे, ऋषिकेश भालेराव, बबन येळे, उमेश सर्वगोड, सागर सोनवणे, विजय देशपांडे, औदुंबर पोतदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment