उजनी जलाशयातील खासगी मासेमारी ठेका व सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 13, 2026

उजनी जलाशयातील खासगी मासेमारी ठेका व सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी

 उजनी जलाशयातील खासगी मासेमारी ठेका व सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी

मच्छीमार संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : उजनी जलाशयातील मासेमारीचा खासगी ठेका देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, तसेच उजनी धरणावर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पही रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

उजनी जलाशयातील मासेमारीचा खासगी ठेका दिल्यास ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसण्याची शक्यता आहे. पकडलेला मासा ठेकेदार ठरवेल त्या दराने विकण्याची सक्ती मच्छीमारांवर होऊ शकते. त्यामुळे मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय संकटात येऊन त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली.

यावेळी उजनी जलाशयावरील सौरऊर्जा प्रकल्प रद्द करावा, ई-टेंडरिंगद्वारे देण्यात येणारा खासगी मासेमारी ठेका रद्द करावा आणि उजनी जलाशयातील मासेमारीचे परवाना पासेस पूर्ववत सुरू ठेवावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात नंदकुमार नगरे, सिताराम भोई, उज्वला परदेशी यांच्यासह अनेक मच्छीमार सहभागी झाले होते.

‘अजितदादा परत या’च्या घोषणांनी वेधले लक्ष

आंदोलनादरम्यान ‘अजितदादा परत या’ असा फलक लक्षवेधी ठरला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अजितदादा पवार दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देत होते. त्यांच्या निधनानंतर मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बांधवांना कोणी वाली राहिला नसल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी ‘अजितदादा परत या...’ अशा घोषणा दिल्या.

१४,९७६ कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध

उजनी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल १४ हजार ९७६ कोटी रुपयांचा ठेका काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. धरणाच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा पॅनल उभारल्यास पाण्याच्या गुणवत्तेवर तसेच मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर उजनी जलाशयातील मासेमारीचा ठेका खासगी ठेकेदारांना देण्याच्या हालचालींमुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय अडचणीत येईल. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता आंदोलकांनी व्यक्त केली.

सौरऊर्जा प्रकल्प आणि खासगी मासेमारी ठेका रद्द करण्यात आला नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages