मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी थेट उचलून नेलं
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- दिल्लीत जंतर-मंतरवरील निषेध आंदोलन आणि संसदेवरील मोर्चादरम्यान तरुणाईला झालेल्या पोलिसांकडून मारहाणीच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधीपक्षाच्या १२० खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.
जवळपास साडेतीन चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी जबरदस्तीनं या खासदारांना ताब्यात घेतलं आणि गाडीतून नेलं. यावेळी राहुल गांधी हे हटत नव्हते म्हणून पोलिसांनी त्यांना अक्षरशः उचलून घेतलं आणि गाडीत बसवलं, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी राहुल गांधी यांची पोलिसांशी झटापटही झाल्याचं दिसून येत आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांची भेटही घेतली. पण राहुल गांधी हे आपल्या मागण्यांवर ठाम होते. सरकारच्या चर्चेनंतरही ते माघार घेत नसल्यानं जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळावरुन निघून गेल्यानंतर थोड्यावेळात तिथं अतिरिक्त पोलीस आले आणि त्यांनी या आंदोलक खासदारांना हटवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यासाठी त्यांनी इथं बसलेल्या खासदारांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा पोलीस राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा ते खाली जमीनीवर झोपून राहिले. त्यामुळं त्यांना हटवणं पोलिसांना कठीण जात होतं.
दरम्यान, अखेर पोलिसांनी चारही बाजूनं राहुल गांधींना झोपलेल्या स्थितीतच उचललं आणि आपल्या पोलीस व्हॅनमध्ये नेलं. त्यांना पोलीस उचलत असताना काही माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जमिनीवर झोपलेल्या अवस्थेतच पोलीस त्यांना उचलत असताना ते म्हणाले की, "आता देशातील लोकशाही संपली आहे"
सरकारला उत्तर द्यावंच लागेल
यावेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कारवाईसाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. सरकारला या संपूर्ण प्रकरणासाठी उत्तर द्यावं लागेल. या आंदोलनावेळी दिल्ली पोलिसांनी अनेक काँग्रेसचे खासदार आणि नेत्यांना ताब्यात घेतलं. यानंतर तिथली परिस्थिती आणखीनंच आक्रमक झाली. यावेळी आंदोलन करत असताना राहुल गांधी यांची पोलिसांसोबत थोडीसी झटापटही झाली.


No comments:
Post a Comment