महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आषाढी वारीत सेवाभाव
वारकऱ्यांना हरिपाठ व फराळ, पोलिसांना रेनकोटचे वाटप
नातेपुते, (कटूसत्य वृत्त):- संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नातेपुते येथे विविध सेवाभावी उपक्रम राबवले. बँकेचे अध्यक्ष गिरीश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उत्तरदायित्वाची जपणूक करत वारकरी भाविक व वारी व्यवस्थापनातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा देण्यात आली.
हरिपाठ, फराळ व रेनकोटचे वाटप
या उपक्रमांतर्गत हजारो वारकरी भाविकांना *अखंड हरिपाठ पुस्तिकांचे वाटप* तसेच *फराळाचे वितरण* करण्यात आले. वारीत अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना *पावसापासून संरक्षणासाठी उत्कृष्ट दर्जाचे रेनकोट* भेट देण्यात आले. बँकेच्या या सामाजिक बांधिलकीचे वारकरी व पोलीस प्रशासनाने विशेष कौतुक केले.
वारी मार्गावर एटीएम व्हॅन
यावर्षी *महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एटीएम व्हॅन नातेपुते ते पंढरपूर* या वारी मार्गावर सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी भाविकांना प्रवासादरम्यान सहजपणे रोख रक्कम व बँकिंग सुविधा मिळत असून या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पदयात्रेत सहभाग
या सेवाभावी उपक्रमात परिसरातील जवळपास सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. क्षेत्रीय कार्यालय, सोलापूरचे क्षेत्रीय व्यवस्थापक किशोर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी बारड ते नातेपुते या वारी मार्गावर वारकऱ्यांसमवेत पदयात्रेत सहभागी होऊन सेवाभावाचा संदेश दिला.
“आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि समाजाशी नाते दृढ करणारा महोत्सव आहे. या पवित्र सोहळ्यात वारकरी भाविकांच्या सेवेसाठी योगदान देता येणे ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अभिमानाची बाब आहे,” असे बँकेच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.
या उपक्रमाबद्दल वारकरी समुदाय, पोलीस प्रशासन व नागरिकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
.jpg)
No comments:
Post a Comment