वारीत साक्षरतेचा जागर; साडेतीनशे निरक्षर वारकऱ्यांची नोंदणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

वारीत साक्षरतेचा जागर; साडेतीनशे निरक्षर वारकऱ्यांची नोंदणी

 वारीत साक्षरतेचा जागर; साडेतीनशे निरक्षर वारकऱ्यांची नोंदणी

‘साक्षरतेची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रथातून वाचन-लेखनाचा प्रचार



सोलापूर (कटूसत्य वृत्त): केंद्र शासनाच्या ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत आषाढी वारीत राबविण्यात आलेल्या ‘साक्षरतेची वारी, पंढरीच्या दारी’ या अभिनव उपक्रमाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत सहभागी झालेल्या साक्षरता दिंड्यांमधून सुमारे साडेतीनशे निरक्षर वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

देशातील १५ वर्षे व त्यावरील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात शिक्षण संचालनालय (योजना), पुणे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या माध्यमातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची प्रेरणा माजी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि राजेश क्षीरसागर यांची असून, राज्य समन्वयक संभाजी देशमुख यांच्या संकल्पनेतून तो आकाराला आला आहे. यंदा शिक्षण संचालनालय (योजना)चे संचालक कृष्णकुमार पाटील आणि उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांच्या मार्गदर्शनाखाली देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांवर स्वतंत्र साक्षरता रथ सहभागी करण्यात आले आहेत.

पथनाट्य, कीर्तनातून साक्षरतेची जनजागृती

साक्षरता रथातून वारकऱ्यांना वाचन-लेखनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारूड, कीर्तन, पथनाट्य, नृत्य आणि जनजागृतीपर घोषणांचा प्रभावी वापर केला जात आहे. ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरी शिका’ आणि ‘अक्षर कळे, संकट टळे’ अशा घोषणांनी पालखी मार्गावर साक्षरतेचा संदेश घुमत आहे.

मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

अकलूज येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी साक्षरता रथाचे स्वागत करून वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड बॉलचे वाटप करण्यात आले.

बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साक्षरता रथाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तर बेलवाडी येथील रिंगण सोहळ्यात शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले.

वारीच्या अध्यात्मिक वातावरणात साक्षरतेचा संदेश पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक वारकरी प्रथमच वाचन-लेखन शिकण्याची प्रेरणा घेत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages