वारीसाठी प्रशासन सज्ज; ३ हजार वाहनांना टोलमुक्त पास, १४ विशेष पथके तैनात
वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी व्यापक नियोजन; 'वॉक ऑन राईट' अभियानासह वाहतूक नियंत्रणावर भर
सोलापूर (कटूसत्य वृत्त): आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि निर्विघ्न व्हावा यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून, यासाठी १४ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारीदरम्यान अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि वारकऱ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. मोहळ, मंगळवेढा, पिलीव, पंढरपूर, इंदापूर, टेंभुर्णी, शेटफळ, सांगोला, माळशिरस आणि अकलूजसह विविध प्रमुख मार्गांवर ही पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती आणि सांगली जिल्ह्यांतून येणाऱ्या मार्गांवरही २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे.
महामार्गावरून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 'सुरक्षित वारी' उपक्रमांतर्गत 'वॉक ऑन राईट' अभियान राबविण्यात येत असून, मार्गावर माहिती फलक लावून अधिकारी व कर्मचारी वारकऱ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन करत आहेत.
यात्रेदरम्यान वारकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ३ हजार वाहनांना टोलमुक्त पास देण्यात आले आहेत. तसेच ऑटोरिक्षा व इतर वाहनचालकांकडून भाविकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून दहा प्रमुख ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात येणार असून, निश्चित भाड्यानुसारच आकारणी होत असल्याची खात्री प्रशासन करणार आहे.
याशिवाय पोलीस विभागाशी समन्वय साधून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी क्रेन आणि मेकॅनिकची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वारीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार असून, वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
No comments:
Post a Comment