तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महापालिकेचा दणका; ४१ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
'आपली तक्रार', 'माय सोलापूर' ॲप आणि लोकसेवा हक्क अधिनियमातील अर्ज वेळेत निकाली न काढल्याचा ठपका
सोलापूर (कटूसत्य वृत्त): नागरिकांच्या तक्रारी आणि लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अर्ज निर्धारित मुदतीत निकाली न काढणाऱ्या महापालिकेतील ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधितांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी जारी केले आहेत.
महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ ॲप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अनेक तक्रारी आणि अर्ज मुदतीनंतरही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू केली असून, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांशी संबंधित अर्ज वेळेत निकाली काढणे आणि पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याबाबत प्रशासनाने यापूर्वीही वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
'आपली तक्रार' पोर्टल आणि 'माय सोलापूर' ॲपवरील प्रकरणे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी १७ कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकूण ५ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज वेळेत निकाली न काढल्याबद्दल २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर २३ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर २८ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून ही रक्कम नियमानुसार वसूल केली जाणार आहे.

No comments:
Post a Comment