श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने घेतले ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून सक्षम, प्रामाणिक आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज असून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन राबविलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मोटे यांनी केले.
शहरातील शिवस्मारक सभागृह येथे श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर उद्योजक केतन वोरा, अथर्व क्लिनिकचे डॉ. सुधाकर मोहोळे, बँक ऑफ इंडियाचे सीनियर मॅनेजर आकाश मुंढे, सोलापूर महानगरपालिकेचे हुद्दा अभियंता अभिजीत बिराजदार, लायन्स क्लब जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष सागर पुकाळे, संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य मोटे पुढे म्हणाले, शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि पालक या दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मोठे व्यक्तिमत्त्व घडण्याची क्षमता असते. आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर करिअर घडविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान केवळ सामाजिक कार्य करत नाही, तर भविष्यातील सक्षम नागरिक घडविण्याचे धाडसी काम करत आहे, असे ते म्हणाले.
प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना, सॅनिटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी उभारणी, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, चित्रकला व निबंध स्पर्धा तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चादर वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.
सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रूपा कुत्ताते, सुजाता सक्करगी, भारती जवळे, ज्योती कासट, दीपक बुलबुले, शामकुमार मुळे, राजू कोकाटे, श्रीरंग रेगोटी, अभिजीत व्हानकळस, आकाश लखोटिया, दिनेश मंत्री, संतोष आलकुंटे, महेश ढेंगळे, दीपक करकी, राजेश केकडे, श्रीनाथ श्रीगण, गणेश येळमेली, सुरेश लकडे, नागेश कोळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट:
बोर्ड परीक्षा शुल्कासह शालेय साहित्य वितरीत
यावेळी इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, बॅग, कंपासपेटी तसेच बोर्ड परीक्षेच्या शुल्कासाठी आवश्यक मदत देण्यात आली. सोलापुरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला असून यंदा ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले. गेल्या नऊ वर्षांत प्रतिष्ठानने एकूण ५११ विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याची माहिती संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविकात दिली.
.png)
No comments:
Post a Comment