जेऊरमध्ये वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची मोहीम; नियमभंग करणाऱ्यांना दंडाचा चाप
करमाळा ,(कटूसत्य वृत्त):-(प्रशांत भोसले) तालुक्यातील जेऊर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोटार वाहन कायद्यानुसार धडक कारवाई केली. या कारवाईत अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, नंबर प्लेट नसलेली वाहने चालविणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी रस्त्यावर तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याच्या वाढत्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच ट्रिपल सीटने प्रवास करणारे, नंबर प्लेट नसलेली वाहने वापरणारे वाहनचालक यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत API ढेरे, पो. ह. निमगिरे, ट्रॅफिक अंमलदार पो. कॉ. कांबळे, पो. कॉ. चव्हाण तसेच निर्भया पथकातील पो. ह. पवार, पो. कॉ. संभाजी पवार आणि पो. कॉ. गुटाळ यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी केलेल्या या मोहिमेत एकूण ४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून संबंधित वाहनचालकांकडून १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी अशा मोहिमा आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळावा, वाहनावर नियमांनुसार नंबर प्लेट असावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment