चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी खा. डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी खा. डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांना निवेदन

 चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी खा. डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांना निवेदन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मा. राज्यसभा खासदार डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांची सदिच्छा भेट घेऊन धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी, सर्वसमावेशक व चालकाभिमुख करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाने चालक बांधवांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि मंडळामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत सविस्तर निवेदन खासदारांना सादर केले.
महासंघाच्या वतीने मंडळामध्ये सदस्यत्व शुल्क कमी करणे, प्रत्येक सदस्यासाठी किमान एक ठोस कल्याणकारी योजना लागू करणे, चालकांसाठी मोफत गणवेश योजना, थर्ड पार्टी विमा सुलभ व परवडणारा करणे, सन्मान निधीऐवजी नियमित पेन्शन योजना सुरू करणे तसेच केवळ रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांपुरते मंडळ मर्यादित न ठेवता परिवहन क्षेत्रातील सर्व चालकांचा समावेश करून समान लाभ देण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
मा. डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भरपूर वेळ देऊन प्रत्येक मागणी अत्यंत बारकाईने ऐकून घेतली. चालक बांधवांना प्रत्यक्षात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी कसे करता येईल आणि शासन स्तरावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी महासंघाला आश्वासन देताना सांगितले की, महासंघाने दिलेले हे निवेदन त्या स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रत्यक्ष भेटून सादर करतील. तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासंघाने चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला असून, चालकांच्या हिताच्या सर्व मागण्या मार्गी लागेपर्यंत हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील, असा विश्वास यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप शिंगे, प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख आणि शहराध्यक्ष मनोहर खांडेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages