मनोरमा को-ऑप. बँकेच्या अंत्रोळीकरनगर शाखेचे रविवारी उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अंत्रोळीकरनगर येथील ११ व्या शाखेचे उद्घाटन रविवारी दि. २६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चेअरमन श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाखेचे उद्घाटन बीओएसएस कॉन्फरन्स बँकचे चेअरमन संजीव खडके, पुणे पीपल्स मल्टिस्टेट को-ऑप. बँकेचे चेअरमन श्रीधर गायकवाड, लोकमंगल को-ऑप. बँकेचे चेअरमन तथा आमदार सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, माजी आ. दिलीप माने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुकुंद पवार, उपनिबंधक उमेश पवार तसेच जिल्हा विशेष लेखा परीक्षक व्ही. बी. डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा को-ऑप. बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे राहणार आहेत. अंत्रोळीकरनगर परिसरातील ग्राहकांना अधिक दर्जेदार व सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही नवीन शाखा सुरू करण्यात येत असल्याचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी सांगितले. दरम्यान, त्यानंतर पुढील १२ वी शाखा तुळजापूर येथे सुरू करण्याचे नियोजन आहे. बँकेचा एनपीए शून्य आणि बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने नवी शाखा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मनोरमा बँकेच्या एकूण ११ शाखा असून १०६६ कोटींचा व्यवसाय आहे.५.२० कोटी रुपये नफा आहे. ठेवी ६३४ कोटीच्या आहेत. सतत आठ वर्षे शून्य टक्के एनपीए आहे.
या पत्रकार परिषदेला मनोरमा मल्टीस्टेट चेअरमन शोभा मोरे, संचालिका डॉ. ऋचा पाटील, गजेंद्र साळुंखे, सुहास भोसले, चंद्रकांत खरटमल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी यांच्यासह बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment