जुनी मिल प्रकरणातील उर्वरित १२२ नागरिकांना मूळ दरात प्लॉट : कुमार करजगी
२० जुलै रोजी जुनी मिल परिसरात संपर्क साधण्याचे आवाहन; ३५ वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाल्याचा दावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जुनी मिल प्रकरणातील उर्वरित १२२ नागरिकांना न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित नागरिकांनी २० जुलै रोजी जुनी मिल परिसरात संपर्क साधावा, असे आवाहन जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत केले.
करजगी म्हणाले की, जुनी मिल बंद झाल्यानंतर हजारो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अनेक कामगारांचे दावे न्यायालयात दाखल नसल्याचे लक्षात आल्यानंतर १९८८ मध्ये जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सुमारे नऊ हजार कामगारांचे दावे दाखल करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळवून देण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.
जुनी मिलची जागा बिल्डर्सना अल्प दरात मिळू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्लॉट मिळावेत, या उद्देशाने न्यायालयीन लिलावात सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी ७७८ नागरिकांनी न्यायालयात रक्कम जमा केली होती. मात्र, विविध कारणांमुळे ती रक्कम न्यायालयात अडकून पडली. त्यानंतर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत पात्र नागरिकांना प्लॉटचे वाटप करण्यात आले.
महापालिकेच्या आरक्षणामुळे १२२ नागरिकांना अद्याप प्रत्यक्ष ताबा मिळालेला नसल्याने त्यांनाही न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे करजगी यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत कामगारांच्या हक्कांसाठी केलेला दीर्घ संघर्ष, शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच प्राप्त झालेल्या डॉक्टरेट सन्मानाचा उल्लेख केला. संघर्ष समितीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या उद्देशानेच हा पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment