सत्ताधाऱ्यांनीच धुडकावला सरकारचा आदेश
पंढरपूरच्या विठुरायाचे व्हीआयपी बंदीचा फज्जा!
महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केलेल्या व्हीआयपी दर्शनाचा बुधवारी (ता.15) पहिल्याच दिवशी पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दर्शनासाठी ताटकळत ठेवले.
तर, दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनेक समर्थकांनी धक्काबुक्की करत मंदिरात प्रवेश केल्याने गेटवर काही काळ गोंधळ उडाला होता.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भावी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. येणाऱ्या भाविकांना वेळेत सुलभ पदस्पर्श दर्शन व्हावे, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
काल दिवसभर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली, मात्र रात्री पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या नातेवाईकांसह व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर आले असता पुरता फज्जा उडाला.
दरम्यान, दर्शनासाठी सोडण्यावरून बराच वेळ गोंधळ उडाला होता. याच वेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या काही समर्थकांनी धक्काबुक्की करत मंदिरात प्रवेश केला, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकांना मात्र गेटवरच ताटकळत थांबवण्यात आले होते.
मंदिर समितीने व्हीआयपी दर्शनाबाबत केलेल्या या दुजाभावानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त करत समन्वयाचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली. तर, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र आम्ही अडीचशे किलोमीटर दूरवरून आलोय. माझा सोबतच्या लोकांनी दर्शन घेतल्याचे सांगितले.
व्हीआयपी दर्शनाचा मोह टाळावा...
विठ्ठलाच्या दर्शनसाठी सर्वसामान्य भाविक तासन्तास रांगेत उभे राहतात. मात्र, व्हीआयपी दर्शनासाठी अनेक वेळा रांग थांबली जाते. यात्रा काळात मंत्री, अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांनी व्हीआयपी दर्शनाचा मोह टाळावा, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment