डॉ. नुसरत सय्यद विशेष सेवा पुरस्कार सोहळा अरविंद गाडेकर यांना प्रदान.
संगमनेर (कटूसत्य वृत्त):- समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव, सामाजिक ऐक्याचा संदेश देत जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटर, संगमनेर आयोजित "डॉ. नुसरत पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरचे अध्यक्ष इदरिस शेख यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी चौदा वर्षांच्या वाटचाली निमित्त आयोजित या कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, सामाजिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. सय्यद आसिफ अली यांची दिवंगत कन्या डॉ.नुसरत सय्यद यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराचे वितरण झाले.
संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार,लेखक,कवी आणि संपादक यांना त्यांच्या सामाजिक,साहित्यिक आणि व्यंगचित्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. अरविंद गाडेकर हे संगमनेर साहित्यिक मंडळ चे अध्यक्ष, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थाचे खजिनदार, आधार फाउंडेशनचे सदस्य, अंनिस संगमनेर शाखाचे सचिव आहेत. या आणि अनेक संस्थाच्या उपक्रमात त्यांचा सहभाग आहे आणि त्या माध्यमातून ते सामाजिक कामात अग्रेसर आहेत.
"डॉ. नुसरत पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बाबा खरात (आदिवासी सेवक ), प्रमुख अतिथी किसन भाऊ हासे (जेष्ठ पत्रकार व संस्थापक संपादक दै.युवावार्ता), प्रमुख पाहुणे हिरालाल पगडाल (वक्ते, शिक्षकनेते), ज्ञानेश्वर राक्षे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महा.शासन पुरस्कार प्राप्त ), अब्दुल्ला चौधरी (सामाजिक कार्यकर्ते ) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोमणी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव, विशेष पुरस्कार,ग्रेट अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे हिरालाल पगडाल यांनी आपल्या भाषणात डॉ. नुसरत असिफ अली सय्यद यांच्या "सआदत हसन मंटो यांची सामाजिक जाणीव आणि राजकीय विचारधारा" या संशोधनग्रंथाचे विशेष कौतुक केले.
प्रमुख अतिथी किसनभाऊ हासे म्हणाले की, "समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मानित करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे."
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी सेवक बाबा खरात म्हणाले,"
एखादी संस्था चौदा वर्ष सामाजिक सलोखा जपून समाजातील विविध स्थरातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याकरिता झटते आणि जेष्ठ यांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करते आणि विदयार्थी यांनी मिळविलेले उत्तुंग यश यांची पाठराखण पुरस्कार देऊन करते हे कौतुकास्पद आहे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप उदमले यांनी प्रभावीपणे केले, तर बाळकृष्ण महाजन यांनी आभार मानले.
या पुरस्काराबद्दल सर्व स्तारातून अरविंद गाडेकर यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment