सोलापूर महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या आदेशानुसार दि. १ जुलै ते ९ जुलै २०२६ या कालावधीत शहरातील सर्व ८ झोनमधील २६ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभला. मोहिमेसाठी विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, नाले, पदपथ, खुल्या जागा, बाजारपेठा आणि शासकीय परिसरांची विशेष स्वच्छता करण्यात आली. कचरा संकलन, दगड-माती व मलबा हटविणे, अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स काढणे, झुडपे व गवत हटविणे, रस्ते धुणे तसेच डिव्हायडर व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अशा विविध कामांची अंमलबजावणी करण्यात आली.
मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे जमादार, झाडूवाले, बिगारी व सफाई कामगार यांनी सहभाग घेतला. या कालावधीत शहरातून सुमारे ९८.५ टन कचरा उचलण्यात आला, तर १९०.५ ब्रास दगड, माती व मलबा हटविण्यात आला. यासाठी महानगरपालिकेचे जेसीबी, डंपर, घंटागाड्या आणि पाणी टँकर/ट्रॅक्टर यांचा वापर करण्यात आला. विविध ठिकाणी झुडपे हटविणे, गवत उचलणे व डिव्हायडरवरील माती साफ करण्याची कामेही करण्यात आली.
विशेष स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील सार्वजनिक परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित करण्यास मोठी मदत झाली असून भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे तसेच आपले सोलापूर शहर नेहमी स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणेबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले.

No comments:
Post a Comment