खा. प्रणिती शिंदे एसआयआर जनजागृती मोहिमेसाठी थेट गावागावात
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील विरवडे (बु.) सह विविध गावांमध्ये बीएलओ, बीएलए आणि काँग्रेस पदाधिकारी - कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला आणि एसआयआर मोहिमेबाबत व्यापक जनजागृती केली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत एनुमरेशन (गणना) फॉर्म अचूकपणे कसा भरायचा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तसेच अर्ज वेळेत सादर करणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे असून, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने सहभागी व्हावे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
गावागावांतील, वाड्या-वस्त्यांवरील तसेच वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांतील एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, यासाठी बीएलओ, बीएलए आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. तसेच प्रत्येक पात्र मतदाराने स्वतः पुढाकार घेऊन एनुमरेशन फॉर्म वेळेत भरून संबंधित बीएलओंकडे जमा करावा. ही कालबद्ध प्रक्रिया असल्याने मुदतीपूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी बीएलओंना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील याची दक्षता घ्यावी, तसेच कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव विनाकारण वगळले जाणार नाही याची खात्री करावी. एसआयआर प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची हलगर्जी होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, भाजपकडून काँग्रेस, विरोधी पक्ष तसेच पुरोगामी विचारांच्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत, काही राज्यांतील निवडणुकांदरम्यान अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात यावी, तसेच प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राहील याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
गृहभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. त्या समस्यांवर प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
एसआयआर मोहिमेच्या माध्यमातून मतदार जागृतीसोबतच लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा हा उपक्रम असून, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी काँग्रेस पक्ष गावागावांत सक्रियपणे जनजागृती करत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, सुनील पवार, बालाजी माने, हरिश्चंद्र अवताडे, दत्तात्रय नामदेव अवताडे, संतोष अवताडे, डॉक्टर शंकर अवताडे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, अशोक मिसाळ, गणपत अवताडे, शिवाजी कुंभार, यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment