एनुमरेशन फॉर्म भरण्याचे प्रणिती शिंदे यांचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकासकामांबाबतची निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक चर्चा केली. तसेच सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र मतदाराने एनुमरेशन (गणना) फॉर्म भरून तो वेळेत सादर करण्याचे आवाहन केले.
कासेगावातील भेटीदरम्यान ग्रामस्थांनी रस्ते, समाजमंदिर तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मांडत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मागण्या केल्या. यावर प्रतिक्रिया देताना खासदार शिंदे यांनी गावांचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे सांगत, कासेगावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना SIR प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांचा एनुमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी आणि तो संबंधित बीएलओ (BLO) यांच्याकडे विहित मुदतीत सादर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, "SIR प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराने एनुमरेशन फॉर्म भरून तो वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणताही पात्र मतदार आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करावे."
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार, माजी सरपंच नेताजी पाटील, सरपंच यशपाल वाडकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, मुबारक तांबोळी, गुड्डू गुंड, रविकिरण मेहता यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment