अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
पुणे,(कटूसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील. आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगितले. शासन अपघातग्रस्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment