समर्थ बँकेची निवडणूक रद्द; ४४ अर्ज नामंजूर, एकमेव उमेदवाराचीही माघार
निवडणूक प्रक्रिया संपुष्टात; आता प्रशासक की नवी निवडणूक? सहकार आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
सोलापूर (कटूसत्य वृत्त): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आर्थिक निर्बंधांमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून व्यवहार ठप्प असलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर पूर्णपणे संपुष्टात आली आहे. एकूण ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असताना, छाननीअंती तब्बल ४४ अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे नामंजूर करण्यात आले. वैध ठरलेला एकमेव अर्जही उमेदवाराने मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार उरला नाही.
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली होती. महिला राखीव मतदारसंघातून स्वाती राजीव देसाई यांचा एकमेव अर्ज वैध ठरला होता. मात्र, त्यांनीही अनपेक्षितपणे उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक प्रक्रिया आपोआपच संपुष्टात आली.
या घडामोडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो राज्याच्या सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सलग नऊ महिन्यांपासून आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या समर्थ सहकारी बँकेसाठी आता पुढील मार्ग कोणता, याकडे सभासद, खातेदार आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सहकार आयुक्तांकडून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार की नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment