नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची पाहणी

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची पाहणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सात रस्ता येथील नाना-नानी पार्कचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक व आकर्षक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या सह उपमहापौर, स्थायी समिती सभापती,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते.
पाहणीदरम्यान उद्यानातील विद्यमान सुविधांचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात उद्यान परिसरात पाणी साचत असल्याने पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. भविष्यात पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच नाना-नानी पार्कच्या नूतनीकरणामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुस्थितीत वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, सजावटीची प्रकाशयोजना, हिरवळीचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळणी, आवश्यक ठिकाणी ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच उद्यानाची नियमित स्वच्छता व देखभाल यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात येणार असल्याची चर्चा यावेळी झाली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नूतनीकरणाचा आराखडा लवकरात लवकर अंतिम करून कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, "नाना-नानी पार्क हे शहरातील नागरिकांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. या उद्यानाचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते अधिक सुंदर, सुरक्षित व सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात येईल. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे प्राधान्य असून, उद्यानाचा विकास आदर्श पद्धतीने करण्यात येईल."स्थायी समिती सभापती सौ. रंजीता चाकोते म्हणाल्या, "नाना-नानी पार्कचे नूतनीकरण करताना नागरिकांच्या गरजा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीला प्राधान्य दिले जाईल. उद्यानात आधुनिक सुविधा, आकर्षक सुशोभीकरण, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, उत्तम प्रकाशयोजना आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक उद्यान उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी व कामांना स्थायी समितीचे पूर्ण सहकार्य राहील."


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages