सोलापूरात मनसेचे 'खड्ड्यांचा केक' कापून अनोखे आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी विविध उपक्रमांचे आयोजन करत असताना, सोलापुरात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उपरोधिक आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाची चांगलीच पोलखोल केली आहे. भाजपच्या "खड्डे दाखवा, आम्ही बुजवू" या आव्हानाचा समाचार घेत मनसेने सोन्या मारुती चौक येथे 'खड्ड्यांचा केक' कापून आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचे पोस्टर्स लावून जोरदार निदर्शने केली.
"देवाभाऊंनी ५६ व्या वर्षात पदार्पण केले आहे, तर पालिका प्रशासनाने शहरातील ५६ खड्डे बुजवून त्याचे लोकार्पण करावे," असा खोचक टोला यावेळी मनसेच्या वतीने लगावण्यात आला.
नेमके काय घडले आंदोलनात?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर भाजप शहराध्यक्षांनी "५६ खड्डे दाखवा, आम्ही तिथेच बुजवण्याचा कार्यक्रम करू," असे जाहीर केले होते. या आव्हानाला उत्तर देत मनसे सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सोन्या मारुती चौक येथे हे उपरोधिक आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांतील भीषण खड्ड्यांचे मोठे पोस्टर्स प्रदर्शित केले. तसेच पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून 'खड्ड्यांचे छायाचित्र असलेला केक' कापण्यात आला.
गंभीर आजार अन् अपघातांना पालिका प्रशासन जबाबदार!
सोलापूर शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार होत आहेत. दररोज लहान-मोठे अपघात घडत असून नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. या सर्व प्रकाराला सर्वस्वी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला.
या अनोख्या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, निलेश भंडारे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस विश्वास गजभार, शहर उपाध्यक्ष वैभव धोत्रे, महिला आघाडी शहर अध्यक्ष जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, शोभा साठे, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, विनायक माढेकर, संतोष बारटक्के, सुवर्णा यादव, गिरिजा कासेगावकर, पद्मावती कुलकर्णी, प्रतिभा माशाळे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
"येत्या काळात सोलापूर शहरातील खड्डे तातडीने बुजवले गेले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल!"
— विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष, मनसे
.png)
No comments:
Post a Comment