दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या- खा. धैर्यशील मोहिते-पाटील
दिल्ली (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी, कार्तिकी वारी तसेच वर्षभर पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सेवा सुरू करून तिला "चंद्रभागा एक्सप्रेस" असे नाव द्यावे, तसेच पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.
या मागणीला अधिक बळ देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ४२ खासदारांच्या सह्या घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर केले.
तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वाहतूक, व्यापार, शेती आणि दळणवळणाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली व महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा केला.
यात प्रामुख्याने पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण व भूमी अधिग्रहणाबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीची बैठक आयोजित करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
माढा तालुक्यातील मोडनिंब येथे 'गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल' (GCT) उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली दिल्ली-कोलकत्ता-मुजफ्फरनगर-शा लिमार 'किसान रेल्वे' सेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली.
तसेच लातूर-कुर्डूवाडी-सोलापूर आणि मिरज-कुर्डूवाडी–दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याची मागणी करण्यात आली. मिरज-कुर्डूवाडी-लातूर रोड या सुमारे ३७५ कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला वेग देण्याचीही मागणी करण्यात आली.
सोलापूर रेल्वे विभागातील वाढती लोकसंख्या आणि पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा विचार करून सांगोला तालुक्यातील जवळा व बामणी, पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके मंजूर करण्याची मागणीही खासदार मोहिते-पाटील यांनी केली.
याशिवाय कुर्डूवाडी-पंढरपूर मार्गावरील वापरात नसलेल्या जुन्या मीटरगेज रेल्वे मार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरून तेथे व्यापारी संकुले उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडण्यात आला.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना दिले.
.png)
No comments:
Post a Comment