श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग

 श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग

पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश




अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, दि. २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयानंतर अवघ्या २४ तासांत विकास प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३०) म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची तयारी करून तो शासनाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे इतर अधिकारी सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपस्थित होते.
आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय दि. २९ जुलै, गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला.
या निर्णयानंतर अवघ्या एकाच दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर आणि भाविकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारण्याचा सविस्तर आराखडा तयार करून पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विकास आराखडाही राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन आणि परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

चौकट-

"महायुती सरकारने अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले, ही अक्कलकोटसाठी ऐतिहासिक बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्री स्वामी समर्थ नगरीचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल. त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो."

सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages