होटगीतच होणार सोलापूरचे आयटी पार्क; २० हेक्टर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित
जलसंपदा विभागाची जमीन विनामूल्य हस्तांतरण; आयटी पार्कच्या जागेवरील वादावर अखेर पडदा
सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूरच्या बहुचर्चित आयटी पार्कसाठी होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जलसंपदा विभागाने होटगी येथील २० हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) विनामूल्य हस्तांतरित केली असून, त्यामुळे आयटी पार्क होटगीतच उभारले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी दहिटणे येथे आयोजित कार्यक्रमात सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने होटगी येथील जलसंपदा विभागाची २० हेक्टर जागा निश्चित केली. एमआयडीसीने या जागेची अधिकृत मागणी केल्यानंतर नियामक मंडळाच्या १२०व्या बैठकीत जमीन विनामूल्य हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार २२ जुलै रोजी उपकार्यकारी अभियंत्यांनी जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही महिन्यांत सोलापूर दौऱ्यादरम्यान होटगी येथील जागा आयटी पार्कसाठी गैरसोयीची असल्याचे मत व्यक्त करत शहराच्या हद्दीत पर्यायी जागा शोधण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आयटी पार्कच्या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्याने होटगी येथील जागेवरच आयटी पार्क उभारले जाईल, असा दावा केला होता. आता जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्या दाव्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
पुढे काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीसीमार्फत आयटी पार्कसाठी अत्याधुनिक इमारत उभारण्याची घोषणा केली आहे. या ठिकाणी टेक महिंद्रासह विविध बीपीओ केंद्रांना जागा उपलब्ध करून देण्याचा तसेच देशातील अन्य आयटी कंपन्यांना सोलापुरात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आता आयटी पार्कच्या इमारत उभारणीच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment