उजनी धरणातून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; धरण ९७.७९ टक्के भरले, भीमा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

उजनी धरणातून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; धरण ९७.७९ टक्के भरले, भीमा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट

 उजनी धरणातून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; धरण ९७.७९ टक्के भरले, भीमा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट

उपशीर्षक : सायंकाळी ६:३० वाजल्यापासून सांडव्यावरून विसर्ग सुरू; धरणात ६५ हजार क्युसेक्सहून अधिक पाण्याची आवक, आवश्यकतेनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या वरच्या तसेच उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत असल्याने पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजल्यापासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात २०,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग कायम राहिल्यास परिस्थितीनुसार या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सायंकाळी ६.०० वाजताच्या नोंदीनुसार उजनी धरणाची पाणीपातळी (RWL) ४९६.७३० मीटर इतकी झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ३२८६.५४ दशलक्ष घनमीटर (११६.०५ टीएमसी) असून, उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा १४८३.७३ दशलक्ष घनमीटर (५२.३९ टीएमसी) इतका आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ९७.७९ टक्क्यांवर पोहोचला असून धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र ३३३.५० चौ.कि.मी. इतके नोंदविण्यात आले आहे.

दरम्यान, दौंड नदी मापन केंद्रावरून उजनी धरणात ६५,०८४ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून नदीची पाणीपातळी ५०१.४५० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील सततचा पाऊस यामुळे उजनी धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
सध्या भीमा नदीपात्रात २०,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्याचबरोबर सीना–माढा उपसा सिंचन योजनेस २८० क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेस ९० क्युसेक्स, भुयारी बोगद्यातून ९०० क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून २,४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
वाढत्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीकाठावरील शेतीपंप, वाहने, जनावरे, शेतीची अवजारे व इतर मौल्यवान साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच लहान मुलांना नदीकाठावर जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, धरणातील पाण्याची आवक पुढील काही तासांतही कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे

सध्या लाईव्ह दोन फोटो पाठवले आहेत 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages