भंडाऱ्याच्या सुवर्णवर्षावात टेंभुर्णीत संत बाळूमामा पालखी सोहळा भक्तिमय; ३११ भाविकांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

भंडाऱ्याच्या सुवर्णवर्षावात टेंभुर्णीत संत बाळूमामा पालखी सोहळा भक्तिमय; ३११ भाविकांचे रक्तदान

भंडाऱ्याच्या सुवर्णवर्षावात टेंभुर्णीत संत बाळूमामा पालखी सोहळा भक्तिमय; ३११ भाविकांचे रक्तदान



टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त आदमापूर येथील सद्गुरू संत बाळूमामा देवालयाची पारंपरिक १५ नंबर पालखी यंदाही टेंभुर्णी शहरात मोठ्या भक्तिभावाने दाखल झाली. पालखीचे आगमन होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. विशेष आकर्षण म्हणजे चार जेसीबीमधून करण्यात आलेली भंडाऱ्याची मुक्त उधळण, त्यामुळे हजारो भाविक अक्षरशः पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. जयघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि "बाळूमामा की जय"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी संत बाळूमामांची महापूजा व आरती संपन्न झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री हरिनामाच्या गजरात कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. द्वादशीच्या पहाटे अभिषेक, महापूजा, आरती आणि महाप्रसादानंतर संत बाळूमामा पालखीची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.

ही मिरवणूक माऊली फ्रुट कंपनी येथून सुरू होऊन करमाळा बायपास, करमाळा चौक, महादेव मंदिर, अकलूज चौक तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडली. मिरवणुकीत हजारो महिला, पुरुष आणि युवक-युवती मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवी बनले होते.

पालखी सोहळ्यानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी हभप आप्पासाहेब उत्तम माळी, २३ जुलै रोजी हभप अमोल सुळ महाराज, २४ जुलै रोजी दादा महाराज ढवळे (आळंदीकर), २५ जुलै रोजी हभप लालचंद महाराज चोपडे, २६ जुलै रोजी हभप संजीवनी ताई शिंगाडे यांची कीर्तने झाली असून, २७ जुलै रोजी हभप विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होत आहे.

या धार्मिक सोहळ्यासाठी सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधून हजारो भाविक टेंभुर्णीत दाखल झाले आहेत. पालखी ३० जुलैनंतर आदमापूरकडे प्रस्थान करणार असून, तोपर्यंत भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचे कार्यक्रम अखंड सुरू राहणार आहेत.

या संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन व आयोजन माऊली फ्रुट कंपनी, माऊली कोल्ड स्टोरेज, माऊली कन्स्ट्रक्शन, माऊली मोटर्स आणि माऊली उद्योग समूह यांच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा हा चौथा पालखी सोहळा अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरा होत असून, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय विठ्ठल माळी, रामदास माळी, सोमनाथ माळी, विठ्ठल माळी तसेच संपूर्ण माळी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन; ३११ भाविकांचे रक्तदान

धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपत संत बाळूमामा पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३११ महिला व पुरुष भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. रक्तसंकलनाचे कार्य सांगोला ब्लड बँकेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडले. धार्मिक श्रद्धेसोबत समाजसेवेचाही संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages