उजनी धरणाच्या विसर्गाने चंद्रभागा दुथडी भरून - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

उजनी धरणाच्या विसर्गाने चंद्रभागा दुथडी भरून

 उजनी धरणाच्या विसर्गाने चंद्रभागा दुथडी भरून

भाविकांना नदीपात्रात जाण्यास बंदी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सुमारे ६१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने पोलिस प्रशासनाने भाविकांना नदीपात्रात जाण्यास मनाई केली असून, सर्व घाटांवर बॅरिकेड्स उभारून सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. पूरनियंत्रणासाठी धरणातून ६१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय वीर धरणातूनही सुमारे ५ हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यात आल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

वाढलेल्या पाणीपातळीमुळे पंढरपुरातील जुन्या दगडी पुलासह तालुक्यातील नदीवरील सर्व आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

दुपारनंतर चंद्रभागा नदीच्या पाण्यात आणखी वाढ झाल्याने नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून, सर्व घाटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. अंबाबाई पटांगण आणि व्यास नारायण परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, भाविक आणि नागरिकांनी नदीकाठी गर्दी टाळावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages