एन. बी. नवले सिंहगडच्या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय कंपनीत यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील कु. संजना टाळकोकुल हिची औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील ‘रॉकवेल ऑटोमेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वार्षिक ६.५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
रॉकवेल ऑटोमेशन ही औद्योगिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते. अशा प्रतिष्ठित कंपनीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची निवड झाल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण पद्धतीला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशातील अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये संगणक अभियांत्रिकी विभागातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यापैकी तीन विद्यार्थ्यांची टीसीएसच्या प्रतिष्ठित डिजिटल प्रोफाइलसाठी निवड झाली असून त्यांना वार्षिक ७ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तसेच सहा विद्यार्थ्यांची निंजा प्रोफाइलसाठी निवड होऊन त्यांना वार्षिक ३.३६ लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, मुलाखत कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांची तयारी करण्यावर विशेष भर दिला जात असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
या यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव कॅम्पसचे संचालक संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख रवींद्र बिरादार तसेच सर्व प्राध्यापकांनी कु. संजना टाळकोकुल हिचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा जपणाऱ्या एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यंदाही आपल्या यशाचा ठसा उमटवला असून, संस्थेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.
.png)
No comments:
Post a Comment