मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून सोलापूर विभागाची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 27, 2026

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून सोलापूर विभागाची पाहणी

 मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून सोलापूर विभागाची पाहणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी २३ व २४ जून रोजी सोलापूर रेल्वे विभागाचा दोन दिवसीय सविस्तर पाहणी दौरा करून विविध विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि आगामी आषाढी वारी २०२६ च्या तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी रेल्वेच्या पायाभूत सुविधांपासून प्रवासी सेवांपर्यंत विविध कामांची तपासणी करत अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधला.

महाव्यवस्थापकांनी लातूर रोड–कुर्डुवाडी–मिरज या सुमारे ३८५ मार्ग-किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरील सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी केली. लातूर येथे क्रू लॉबी, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इमारत, वॉशिंग-कम-पिट लाइन, स्टेबलिंग लाइनचे बांधकाम, मराठवाडा रेल कोच फॅक्टरी तसेच 'अमृत भारत स्टेशन योजना' अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. घर्णी येथे प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकाबाबतही त्यांनी माहिती घेतली.

दौऱ्यात मांजरा, सीना आणि भीमा नदीवरील पूल, बोगदा क्रमांक २, लेव्हल क्रॉसिंग गेट, ३३ केव्ही वीज वाहिनी क्रॉसिंग, ब्रिज मास्ट व्यवस्था तसेच रेल्वे सुरक्षेशी संबंधित विविध अभियांत्रिकी कामांची पाहणी करण्यात आली.

येडशी रेल्वे स्थानकाच्या भेटीदरम्यान स्थानकाची स्वच्छता, हाऊसकीपिंग, प्रवासी सुविधा आणि परिसराची देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी रेल्वेच्या विविध विभागांनी केलेल्या समन्वित कामाचे त्यांनी कौतुक केले.

कुर्डुवाडी येथे रेल्वे वर्कशॉप, रनिंग रूम, अल्ट्रासोनिक फ्लॉ डिटेक्शन कार्यालय, 'कवच' सुरक्षा प्रणाली कक्ष आणि गँग हटची पाहणी करून त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रेल्वे सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी आढावा घेतला.आषाढी वारीच्या तयारीवर विशेष भर

पंढरपूर येथे महाव्यवस्थापकांनी आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गर्दी नियंत्रण, स्वच्छता आणि रेल्वे संचालनाची सज्जता यावर त्यांनी विशेष भर दिला.

वारीदरम्यान भाविकांकडून रेल्वे रुळांवरून पारंपरिक मार्गक्रमण केले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. तसेच कुर्डुवाडी आणि पंढरपूर येथे लोकप्रतिनिधी व प्रवाशांकडून स्थानक विकास आणि रेल्वे गाड्यांच्या थांब्यांसंदर्भातील निवेदने स्वीकारून विविध मागण्यांवर चर्चा केली.

या पाहणी दौऱ्यात सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यामुळे सोलापूर विभागातील विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवासी सुविधांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages