सोलापूर (कटूसत्य वृत्त ) : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली असून तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 9 जून ते 12 जून 2026 या कालावधीत विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील विविध मंडळांतील ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात निर्धारित तारखेला आणि वेळेत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
तहसीलदार विनायक मगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोट मंडळातील मातनहळ्ळी, नागनहळ्ळी, उमरगे, निमगाव, गळोरगी, गौडगाव खुर्द, बासलेगाव आणि समर्थनगर येथे मंडळ अधिकारी जबेर नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.
वागदरी मंडळातील वागदरी, साफळे, खैराट, भुरीकवठे, गोगाव, बादोले बुद्रुक, सांगवी बुद्रुक, हिंगणी, कोळेकरवाडी, सांगवी खुर्द, ममदाबाद आणि कोळीबोट या ग्रामपंचायतींमध्ये मंडळ अधिकारी भासगी आर. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत होणार आहे.
शिरसी, काळेगाव आणि बादोले खुर्द या ग्रामपंचायतींसाठी सहाय्यक महसूल अधिकारी एस. एन. धर्मसाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वागदरी मंडळातील चपळगाव, बावकरवाडी, हन्नूर, बऱ्हाणपूर, हालहळळी, डोंबरजवळगे, अकतनाळ, पितापूर आणि चपळगाववाडी या ग्रामपंचायतींमध्ये मंडळ अधिकारी विठ्ठल मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया होणार आहे.
मैंदर्गी मंडळातील तोरणी, भोसगे, बणजगोळ, संगोगी, मिरजगी, चिक्केहळ्ळी, सातनदुधनी आणि कल्लापवाडी या ग्रामपंचायतींसाठी मंडळ अधिकारी श्रीमती एस. आय. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दूधनी मंडळातील इब्राहिमपूर, मुगळी, बोरोटी खुर्द, चिंचोळी, बबलाद, सिन्नूर, बोरोटी बुद्रुक आणि नागोरे येथे मंडळ अधिकारी प्रदीप जाधव यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
जेऊर मंडळातील ब्यागेहळ्ळी, दोडयाळ, गौडगाव बुद्रुक, जेऊर आणि कर्जाळ या ग्रामपंचायतींमध्ये मंडळ अधिकारी रमाकांत भासगी हे सोडत प्रक्रिया पार पाडणार आहेत.
नागणसूर मंडळातील तोळणूर, हैद्रा, मराठवाडी, नागणसूर, गुरववाडी आणि उडगी या ग्रामपंचायतींसाठी मंडळ अधिकारी महादेव स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तडवळ मंडळातील तडवळ, गुड्डेवाडी, चिंचोळी, आळगे, कोर्सेगाव, कुमठे, मुंढेवाडी आणि शेगाव येथे मंडळ अधिकारी चारूदत्त काकडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा होणार आहेत.
करजगी मंडळातील सुलेरजवळगे, कल्लहिप्परगे, आंदेवाडी बुद्रुक, आंदेवाडी खुर्द, देविकवठे, हंद्राळ आणि हिळ्ळी या ग्रामपंचायतींमध्ये मंडळ अधिकारी मल्लीनाथ सुतार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किणी मंडळातील किणी, काझीकणबस, किणीवाडी, कुरनूर, मोटयाळ, सिंदखेड, किरनळ्ळी आणि गाव चुंगी या ग्रामपंचायतींमध्ये मंडळ अधिकारी रामकुमार कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आरक्षण सोडत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यानंतर विविध प्रवर्गांसाठी जागांचे आरक्षण निश्चित होणार असल्याने इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि ग्रामस्थांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.
तहसीलदार विनायक मगर यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि इच्छुक उमेदवारांनी विशेष ग्रामसभांना उपस्थित राहून आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment