शहरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावबंदीवर निर्बंध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 10, 2026

शहरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावबंदीवर निर्बंध

 शहरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावबंदीवर निर्बंध

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 9 जून ते 23 जून 2026 या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 अन्वये हा आदेश जारी करण्यात आला असून विविध प्रकारच्या शस्त्रबंदी, जमावबंदी आणि मिरवणुकांवरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 9 जून 2026 रोजी पहाटे 12.01 वाजल्यापासून ते 23 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण हद्दीत हा आदेश प्रभावी राहणार आहे.

आदेशानुसार या कालावधीत तलवारी, भाले, दंडुके, सोटे, लाठ्या, चाकू, बॅटन, अग्निशस्त्रे, विनापरवाना बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणारी कोणतीही धोकादायक वस्तू बाळगण्यास किंवा वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परवानाधारक शस्त्रधारकांना किंवा सक्षम प्राधिकरणाची विशेष परवानगी असलेल्या व्यक्तींना यामधून सूट देण्यात आली आहे.

तसेच कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे, संक्षारक पदार्थ किंवा हिंसक कृत्यांसाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या वस्तूंचा साठा करणे, वाहतूक करणे किंवा त्यांची जमवाजमव करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती, प्रेत, आकृती किंवा पुतळ्यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक टीका करणारी किंवा भावना भडकावणारी गीते गाणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, तसेच सामाजिक नैतिकता, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा सुरक्षेला बाधा पोहोचवू शकतील अशी चित्रे, फलक, चिन्हे किंवा साहित्य प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करून कोणीही शस्त्र, स्फोटके किंवा अन्य प्रतिबंधित वस्तू घेऊन फिरताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला निःशस्त्र करण्यात येईल. त्याच्याकडील साहित्य जप्त करून राज्य सरकारकडे जमा करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(3) अंतर्गत शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही मिरवणूक काढणे, तसेच मिरवणुकीमध्ये लाऊडस्पीकर, वाद्यवृंद, बँड किंवा फटाक्यांचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

मात्र काही बाबींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, सहकारी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या कायदेशीर बैठका, शैक्षणिक उपक्रम, शाळा-महाविद्यालयांमधील नियमित कार्यक्रम, सरकारी व निमसरकारी कार्यालयांतील कामकाज, न्यायालयीन प्रक्रिया, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम तसेच कारखाने, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमधील नियमित कामकाज यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

तसेच विभागीय पोलीस उप आयुक्त किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणुका, सभा किंवा कार्यक्रमांना आवश्यक अटी व शर्तींसह परवानगी दिली जाऊ शकते, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारी सेवेत असलेले अधिकारी-कर्मचारी, कर्तव्याच्या अनुषंगाने शस्त्र बाळगणारे कर्मचारी तसेच खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा आणि चौकीदार यांनाही काही अटींसह या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यांना साडेतीन फूट लांबीपर्यंतच्या लाठ्या बाळगण्याची मुभा राहणार आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हा आदेश शहरातील सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार असून लाऊडस्पीकर, मेगाफोन आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

शहरातील शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages