शेतकऱ्यांना इंदापूरप्रमाणे ८ तास वीज द्या; आ.पाटील यांची मागणी
करमाळा (कटूसत्य वृत्त) :- करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या लोडशेडिंगचा मोठा फटका बसत असून हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्याप्रमाणे करमाळा तालुक्यातील शेतीपंपांना दररोज किमान आठ तास अखंडित व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी केली.
या मागणीसाठी आज करमाळा येथे शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार नारायण आबा पाटील स्वतः या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील श्री दत्त मंदिरासमोरून मोर्चास प्रारंभ झाला. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.
यावेळी महावितरणच्या बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मगर, करमाळा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, जेऊर विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. भोयर तसेच करमाळा विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. कलावते यांनी आमदार पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारले.
मोर्चाला संबोधित करताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच महावितरणकडून होत असलेल्या वीज कपातीमुळे उभी पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांसमोर आणखी एक गंभीर संकट निर्माण झाले आहे.
“सर्वांना समान न्याय या तत्त्वावर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही इंदापूर तालुक्याप्रमाणे आठ तास अखंडित वीजपुरवठा तातडीने सुरू करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मोर्चाचे प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. या मोर्चात कृषिभूषण दादासाहेब पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, भाऊसाहेब गोडसे, अतुल पाटील, स्वप्निल काळे, ज्ञानेश्वर बिचीतकर, धुळा कोकरे, डॉ. हरीदास केवारे, देवानंद बागल, महेंद्र पाटील, रविकिरण फुके, विजय नवले, दत्तात्रय देशमुख, राजाभाऊ कदम, आबासाहेब अंबारे, दत्तात्रय गव्हाणे, किरण कवडे, संतोष पाटील, रामेश्वर तळेकर, प्रा. डॉ. संजय चौधरी, पृथ्वीराज पाटील, प्रमोद बदे, सोमनाथ देवकाते, मौलाना मुलाणी, विकास गलांडे, किसन शिंदे, भैय्यासाहेब शिंदे, गहिनीनाथ दुधे, संजय गलांडे, अमर ठोंबरे, चंद्रप्रकाश दराडे, नाना गोडगे, संदीप मारकड, विलास बयडे, गोवर्धन करगळ, संजय फडतरे, आबासाहेब गायकवाड, शशिकांत नरुटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment