संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत सूचना
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गावपातळीवरील पाणीपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवून सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिले.
जिल्हा परिषदेत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीश सपताळे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी एन. एस. लाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख आणि समिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीत कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, यांत्रिकी विभाग तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेततळे योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तर भूजल सर्वेक्षण विभागाने तालुकानिहाय भूजल पातळीतील वाढ-घट याबाबत सादरीकरण करून सद्यःस्थितीची माहिती दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिरभावी व आंधळगाव पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मृद व जलसंधारण विभागाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची स्थिती, साठवण तलाव आणि सुरू असलेल्या सर्वेक्षणाची माहिती सादर केली. तसेच ग्रामीण भागातील बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना यांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.
जिल्ह्यातील जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढविणे आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांतील नागरिकांना वेळेवर दिलासा देण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय व सजगपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. पाणीटंचाईच्या प्रश्नावर दीर्घकालीन नियोजनाबरोबरच तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
No comments:
Post a Comment