नागरिकांना डिजिटल सुविधा देण्यासाठी महापालिकेचा ‘अॅप रिलाय’शी करार
आयटी तज्ज्ञांचे विनामूल्य सहकार्य; तक्रार निवारण प्रणाली होणार अधिक गतिमान
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने ‘अॅप रिलाय टेक्नॉलॉजी’ कंपनीशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार केला आहे. या करारामुळे महापालिकेच्या डिजिटल परिवर्तनाला गती मिळणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या विविध तांत्रिक प्रकल्पांची वेळेत पूर्तता करण्यासाठी आणि डिजिटल सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी हा करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यपद्धतीचे सादरीकरण केले. त्यानंतर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, संगणक प्रोग्रामर नागनाथ पदमगोंडा, सहायक प्रोग्रामर मतीन सय्यद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अॅप रिलाय टेक्नॉलॉजीचे संचालक साकेत मोकाटे व प्रसाद कंदलगावकर यांच्यासह गिरीश येलका, ओंकार व्हटकर, उमाकांत कुलकर्णी, नीरज देवस्थळी, प्रथमेश दुधनीकर, रोहन देशमाने आणि अक्षय बाचुवार यांनी महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनासाठी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.
बैठकीत महापालिकेच्या विद्यमान प्रणालींचे आधुनिकीकरण, जुन्या सॉफ्टवेअर प्रणालींचे नवीन तंत्रज्ञानावर स्थलांतर, ईआरपी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन, डेटाबेस सुरक्षा, प्रकल्प नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच अॅजाईल आणि स्क्रम पद्धतींचा वापर, गुणवत्ता तपासणी, सिस्टिम इंटिग्रेशन, एपीआय सहाय्य आणि कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण यावरही भर देण्यात आला.
सहा कोटी रुपयांची बचत : ओम्बासे
सोलापूर महापालिकेत एआय आधारित अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून तिची सुरुवात तक्रार निवारण व्यवस्थेपासून केली जाणार आहे. ही प्रणाली संबंधित कंपनीकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असल्याने महापालिकेची मोठी आर्थिक बचत होणार आहे. यापूर्वी एका संस्थेने याच प्रणालीसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला होता. मात्र, नव्या कंपनीकडून ही सुविधा मोफत मिळाल्याने महापालिकेचा मोठा फायदा झाला असल्याची माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. येत्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने विविध विभागांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून कामकाज अधिकाधिक पेपरलेस करण्याचा मानस आहे.
दर्जेदार सेवा मिळणार : कोंड्याल
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. या सहकार्यामुळे महापालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तक्रारींचा तत्काळ निपटारा : चाकोते
या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या डिजिटल सेवांची गुणवत्ता वाढण्यास, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास आणि कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व तांत्रिक मार्गदर्शनासाठी कोणताही अतिरिक्त खर्च होणार नसल्याने महापालिकेचा फायदा होईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासही मदत होणार असल्याचे स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment