प्रत्येक गावात मोफत बियाणे केंद्र सुरू करण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

प्रत्येक गावात मोफत बियाणे केंद्र सुरू करण्याची मागणी

 प्रत्येक गावात मोफत बियाणे केंद्र सुरू करण्याची मागणी

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यावर भर; खासदार प्रणिती शिंदे यांचे निवेदन

सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना वेळेत, दर्जेदार आणि मोफत बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रत्येक गावात मोफत बियाणे वितरण केंद्र अथवा बियाणे दुकान सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. बियाण्यांच्या वाढत्या किमती, हवामानातील बदल, दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादन खर्चात सातत्याने होणारी वाढ यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे खासदार शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गावपातळीवरच मोफत व दर्जेदार बियाण्यांची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात प्रत्येक गावातील केंद्रांमधून प्रमाणित व उच्च दर्जाची बियाणे उपलब्ध करून देणे, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवश्यक बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवणे तसेच ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने वितरण व्यवस्था राबविण्याची सूचना करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, शेती उत्पादनात वाढ होईल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages