आमदार कल्याणशेट्टी - म्हेत्रे एकाच व्यासपीठावर येणार का?
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात एकेकाळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत पाहायला मिळत होती. मात्र बदलत्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील समीकरणेही बदलली. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी नवी राजकीय रेषा निर्माण झाली. आता मात्र सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही राजकीय प्रवाह एकाच दिशेने वाहताना दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात महायुतीची सत्ता असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे सत्तेतील प्रमुख घटक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा झाली असली तरी विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्व घटक पक्षांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे.
या निवडणुकीत भाजपने माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकाच ध्येयासाठी काम करावे लागणार आहे. अक्कलकोटमध्येही आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक एकाच बाजूने सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असले तरी राज्यातील सत्तासमीकरणे लक्षात घेता भाजप उमेदवाराच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना या निवडणुकीत एकाच व्यासपीठावर पाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्याचे महत्त्व विशेष ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण ६१६ मतदारांपैकी सुमारे ८० मतदार अक्कलकोट तालुक्यातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील मतदारांचा कौल निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणारा ठरू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या आणि त्यांचा राजकीय प्रभाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अक्कलकोटकडे लागले आहे.
यापूर्वीच्या विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा होती. त्यांच्या सहकार्यामुळे तत्कालीन भाजप उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकांमध्ये अक्कलकोटच्या नेतृत्वाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी हे महायुतीतील प्रभावी युवा नेतृत्व म्हणून उदयास आले असून राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने अक्कलकोटमधील राजकीय प्रतिस्पर्धी नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment