माळशिरस तालुक्यात गुटखा-मावा विक्री जोमात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

माळशिरस तालुक्यात गुटखा-मावा विक्री जोमात

माळशिरस तालुक्यात गुटखा-मावा विक्री जोमात
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह


 श्रीपूर (कटूसत्य वृत्त) : माळशिरस तालुक्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्या, तरी त्या केवळ जुन्या रेकॉर्डवरील अथवा नेहमीच्या संशयितांपुरत्याच मर्यादित राहत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परिणामी तालुक्यात गुटखा आणि माव्याची विक्री आजही जोमात सुरू असल्याचा आरोप होत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुटखा, मावा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातही अशा पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

स्थानिकांच्या मते, कारवाईचे वृत्त आणि छापे यांची माहिती सातत्याने समोर येत असली तरी प्रत्यक्षात गुटख्याचा पुरवठा आणि विक्री पूर्ववत सुरूच आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कारवाया प्रभावी असतील तर प्रतिबंधित माल बाजारात इतक्या सहजपणे उपलब्ध कसा होतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यामागील मोठे पुरवठादार, साठेबाज आणि आर्थिक लाभ घेणाऱ्या प्रमुख घटकांपर्यंत प्रशासनाची कारवाई पोहोचत नसल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवरील कारवायांपेक्षा संपूर्ण पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि वितरण या सर्व स्तरांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवायांवर भर न देता गुटखा विक्रीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन मोठ्या पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages