प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास; बाजार समित्यांमध्ये गोंधळ
नाशिक (कटूसत्य वृत्त):- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेली नाफेड आणि एनसीसीएफची बाजार समितीतील कांदा खरेदी योजना पहिल्याच दिवशी कोलमडल्याचे चित्र सोमवारी नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाले. बाजार समित्यांमध्ये थेट कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही प्रत्यक्ष लिलावाच्या वेळी संबंधित संस्थांचे प्रतिनिधीच गैरहजर राहिल्याने एकाही ठिकाणी अपेक्षित खरेदी होऊ शकली नाही.
सोमवारपासून शासकीय खरेदी सुरू होणार या आशेने शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आणला होता. त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये नियमित दिवसांपेक्षा दुप्पट आवक झाली. मात्र दिवसभर नाफेड आणि एनसीसीएफचे प्रतिनिधी न आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर अनेकांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागला.
जिल्ह्यातील निफाड उपबाजार आणि देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभरात अवघ्या नऊ क्विंटल कांद्याची नाममात्र खरेदी झाली. तर मुख्य केंद्र असलेल्या लासलगावमध्ये खरेदी केंद्र सुरूच होऊ शकले नाही. सटाणा, उमराळे, सिन्नर, चांदवड, मालेगाव, पिंपळगाव आणि येवला बाजार समित्यांमध्ये केवळ कांद्याची प्रतवारी पाहणी करण्यात आली.
नाफेडच्या काही संस्थांकडून तुरळक खरेदी करण्यात आली असली तरी एनसीसीएफ नियुक्त संस्थांनी अनेक ठिकाणी खाते उघडण्याची प्रक्रियाही पूर्ण केली नव्हती. चांदवड तालुक्यात खरेदीसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात प्रतिनिधीच अनुपस्थित राहिल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण गोंधळामागे विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक आणि वाहतूक करण्याची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळाकडे (सीडब्ल्यूसी) असली तरी आवश्यक साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत पुरेशी पूर्वतयारी झालेली नव्हती.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारपासून सीडब्ल्यूसीचे अधिकारी बाजार समित्यांमध्ये उपस्थित राहतील आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले आहे. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment