एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा

 एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा

आमदार बच्चू कडूंच्या वक्तव्याने महायुतीतील नेतृत्व चर्चेत



अमरावती (कटूसत्य वृत्त) : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारे विधान करत आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतील नेतृत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा, अशी अपेक्षा प्रत्येक शिवसैनिकाची असणे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व केले असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आजही मोठा आदर आहे.”
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेवर कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “फडणवीस यांना आणखी मोठी जबाबदारी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांचे प्रमोशन करून राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. त्याचवेळी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या हाती द्यावी, अशी भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. महायुतीतील नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेतृत्व आणि सत्तासमीकरणांबाबत चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून बच्चू कडू यांच्या वक्तव्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages