सोलापूर (कटूसत्य वृत्त): गोकुळ शुगर लि., धोत्री या सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिल तात्काळ मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती, तुळजापूर आणि अक्कलकोट यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी दुपारी १२.०१ वाजता विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे नेते अमोल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, गेल्या १६ दिवसांपासून सोलापूर येथील पूनम गेट परिसरात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ४ जून रोजी सहप्रादेशिक साखर विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून संताप व्यक्त केला होता. तरीही कारखाना व्यवस्थापनाकडून थकीत ऊस बिलाबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्याने शेतकरी आता टोकाची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
या जलसमाधी आंदोलनात तुळजापूर व अक्कलकोट परिसरातील सुमारे ५०० शेतकरी सहभागी होणार आहेत. पूनम गेट येथून रंगभवन, सातरस्ता, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विजापूर रोडवरील कंबर तलावापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
या निवेदनावर अरविंद घोडके, अमित पाटील, त्रिलोक पाटील ‘क्रांती’, रवि कचेरे आणि नामदेव महाबोरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मृग नक्षत्राच्या तोंडावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासन आणि साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा थकीत बिलाचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment