घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका; गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले!
प्रती सिलिंडर २९ रुपयांची वाढ; महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
मानेगाव (कटूसत्य वृत्त): जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होत असून, शासनाने ७ जून रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे विशेषतः गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, कुटुंबाचा खर्च भागविणे अधिक कठीण झाले आहे.
सध्या विविध कंपन्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९२० ते ९२६ रुपयांवरून वाढून ९५० ते ९५६ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही झाला आहे.
खाद्यतेलाच्या दरांनीही उच्चांक गाठला असून एका तेलाच्या डब्यासाठी २५५० ते २६५० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय खोबरे, शेंगदाणे, डाळी आणि इतर किराणा वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. घरगुती वीज बिल, मोबाईल रिचार्ज आणि दैनंदिन गरजेच्या सेवांचा खर्चही वाढल्याने सामान्य कुटुंबांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे.
सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि गृहिणी चिंतेत असून, घरखर्च कसा भागवायचा, मुलांचे शिक्षण कसे चालवायचे आणि बँका तसेच वित्तीय संस्थांचे हप्ते कसे भरायचे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
एकीकडे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना दुसरीकडे महागाईचा वाढता भस्मासूर सर्वसामान्यांच्या जगण्यावर घाला घालत आहे. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास इंधन व घरगुती गॅस सिलिंडरचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महागाईचा हा वाढता आलेख कधी थांबणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment