माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या कुटुंबाला धमक्या; लंडनमध्ये मुलीवर हल्ला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या कुटुंबाला धमक्या; लंडनमध्ये मुलीवर हल्ला

माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या कुटुंबाला धमक्या; लंडनमध्ये मुलीवर हल्ला

दाऊदी बोहरा नेतृत्व प्रकरणातील निकालानंतर वाढला तणाव; ब्रिटनच्या दहशतवादविरोधी यंत्रणांकडून चौकशी

मुंबई (कटूसत्य वृत्त) : दाऊदी बोहरा समाजाच्या नेतृत्वावरील वादग्रस्त खटल्यात दिलेल्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारत व ब्रिटनमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून धमक्या व हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी ब्रिटनमधील कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि दहशतवादविरोधी विभागाकडून सुरू आहे.

दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या निधनानंतर समाजाच्या नेतृत्वावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या पुत्र मुफद्दल सैफुद्दीन यांनी ५३ वे दाई म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, बुरहानुद्दीन यांचे सावत्र बंधू खुजैमा कुतुबुद्दीन यांनी स्वतःला वैध उत्तराधिकारी घोषित करत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.

२०१६ मध्ये कुतुबुद्दीन यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ताहेर फखरुद्दीन यांनी खटला पुढे चालविला. तब्बल नऊ वर्षांच्या सुनावणीनंतर एप्रिल २०२४ मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी फखरुद्दीन यांचा दावा फेटाळून लावत मुफद्दल सैफुद्दीन यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली होती. हा निकाल सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे.

धमक्यांची मालिका

न्यायमूर्ती पटेल यांच्या कुटुंबाला गेल्या दहा महिन्यांत अनेक धमकीची पत्रे प्राप्त झाली आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये प्रथम धमकी देण्यात आली होती. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी तसेच लंडनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्ये घरात घुसखोरी केल्याचा दावाही करण्यात आला होता.

अलीकडेच प्राप्त झालेल्या नव्या पत्रात हिंसाचार अधिक वाढविण्याचा इशारा देण्यात आला असून कुटुंबाविरोधात ‘कॉन्ट्रॅक्ट’ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

लंडनमध्ये मुलीवर हल्ला

२२ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीवर लंडनमध्ये एका अज्ञात मुखवटाधारी व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर ती रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आली. या प्रकरणाची चौकशी ब्रिटनच्या दहशतवादविरोधी यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, लंडनमधील त्यांच्या मुलीला जर्मनीतील टपाल शिक्क्यासह एक निनावी पत्र पाठविण्यात आले होते. त्यासोबत एक डिजिटल स्टोरेज डिव्हाइसही पाठविण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबीयांनी ते उघडले नसून ते सध्या हर्टफोर्डशायर पोलिसांच्या ताब्यात आहे.

निकाल मागे घेण्याची मागणी

धमकीच्या पत्रांमध्ये न्यायमूर्ती पटेल यांनी दाऊदी बोहरा नेतृत्व प्रकरणातील आपला निकाल सार्वजनिकरीत्या मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात यूट्यूबवर व्हिडिओ प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

न्यायमूर्ती पटेल यांनी या सर्व घटनांची माहिती भारताचे सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती तसेच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला दिली आहे. यापूर्वी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यातही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पार्श्वभूमी

२३ एप्रिल २०२४ रोजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दाऊदी बोहरा समाजाचे विद्यमान धर्मगुरू मुफद्दल सैफुद्दीन हेच समाजाचे वैध नेते असल्याचा ऐतिहासिक निकाल दिला होता. न्यायालयाने ताहेर फखरुद्दीन यांचा दावा फेटाळून लावत त्यांना वैध उत्तराधिकारी असल्याचे सिद्ध करता आले नसल्याचे नमूद केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages