सजग नागरिकाच्या सतर्कतेने वृक्षतोड रोखली; कटर टाकून संशयित पसार
निर्मिती विहार परिसरातील घटना; २५ झाडे तोडण्याची तयारी उघड
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील १११ झाडांच्या कत्तलीचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी पुन्हा एकदा मनपाच्या मालकीच्या खुल्या जागेतील वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला. एका सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे ही वृक्षतोड वेळेत रोखण्यात यश आले असून, घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना पाहताच संबंधित व्यक्तींनी वृक्षतोडीचे साहित्य तेथेच टाकून पलायन केल्याची घटना निर्मिती विहार परिसरात घडली.
निर्मिती विहार परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेत काही जण झाडे तोडत असल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच उपमहापौरांनी महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पाठविले.
अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी एक झाड तोडण्यात आले होते. मात्र, आणखी २५ वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचे तपासात समोर आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच वृक्षतोड करणारी मंडळी तेथून पळून गेली.
कारवाईदरम्यान वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारे कोयते, झाडे तोडण्याची मशीन, पेट्रोल, रासायनिक पदार्थ तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
"वृक्ष हे शहराचे फुप्फुस आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल," असे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या वृक्षतोडीच्या घटनांमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, या प्रकारामुळे पुन्हा एकदा वृक्षसंवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment