नातेवाइकांनाच स्ट्रेचर, व्हीलचेअर ओढण्याची वेळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

नातेवाइकांनाच स्ट्रेचर, व्हीलचेअर ओढण्याची वेळ

 नातेवाइकांनाच स्ट्रेचर, व्हीलचेअर ओढण्याची वेळ

सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता; खराब रस्त्यांमुळे रुग्णांच्या वेदनांत भर



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची संख्या पुरेशी असली तरी त्यांचे संचालन करण्यासाठी आवश्यक चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वॉर्डबॉय उपलब्ध नसल्याने रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्यासाठी नातेवाइकांनाच स्ट्रेचर व व्हीलचेअर ढकलावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे आणि ग्रामीण भागातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात येतात. अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत असतात. अशा परिस्थितीत एक्स-रे, सोनोग्राफी, विविध तपासण्या किंवा वॉर्डापर्यंत पोहोचण्यासाठी नातेवाइकांनाच रुग्णांची जबाबदारी उचलावी लागत आहे.

रुग्णालयाकडे स्ट्रेचर व व्हीलचेअरची कमतरता नसली तरी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. आपल्या आजारी नातेवाइकाला उपचारासाठी वेळेत नेण्याच्या धावपळीत त्यांना अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण सहन करावा लागत आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर नेताना रुग्णांना मोठमोठे धक्के बसतात. फ्रॅक्चर झालेले रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी जात असलेले रुग्ण तसेच गंभीर रुग्णांना या धक्क्यांमुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.

"उपचार मिळण्यापूर्वीच रुग्णालयातील खराब रस्त्यांमुळे रुग्णाचा जीव मेटाकुटीला येतो," अशी संतप्त प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाइकाने व्यक्त केली.

आधीच रुग्णाच्या आजारपणामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या नातेवाइकांना रुग्णालयात आवश्यक मदत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी

रुग्ण व नातेवाइकांकडून रुग्णालय प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने का होईना तातडीने नियुक्ती करावी तसेच रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages