पावसाळा आला पण उपाय नाहीच; यंदाही विडी घरकूल जलमय होण्याची भीती
पाणी निचऱ्याची समस्या कायम; गेल्यावर्षीच्या पुराचा अनुभव अजूनही ताजा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे जुने विडी घरकूल परिसरातील शेकडो कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, यंदाचा पावसाळा तोंडावर आला असतानाही पाणी निचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
मागील वर्षी ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे संभाजी शिंदे प्रशाला परिसर, ईएचजी ग्रुप, प्रियदर्शनी नगर, तुळजाई भोसले नगर, भारतनगर, ब्रह्मानंद नगर, चाकोते नगर आणि मल्लिकार्जुन नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये घाण पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, फर्निचर तसेच व्यावसायिक आस्थापनांमधील साहित्याचे नुकसान झाले होते. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून परिस्थितीचा सामना करावा लागला होता.
नाल्याचे काम अद्याप अपूर्ण
स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, कामाच्या संथ गतीमुळे यंदाही पाणी साचण्याचा धोका कायम आहे. नाल्याची खोली, रुंदी आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास पुन्हा एकदा परिसर जलमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घरकूल परिसरातील काही भागांमध्ये नाल्यांची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.
प्रशासनाचा दिलासा
याबाबत मनपाचे विभागीय अधिकारी एम. एच. बक्षी यांनी सांगितले की, "पावसाळ्यात दरवर्षी विडी घरकूल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नालेसफाई आणि ड्रेनेज लाइन सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. तसेच महापालिकेकडून नालेबांधणीचे कामही सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल."
प्रभावी उपाययोजना कागदावरच?
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी मान्सूनपूर्व तयारी आणि नालेसफाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मुख्य नाल्यांचे रुंदीकरण, ड्रेनेज लाइनची क्षमता वाढविणे आणि पर्यायी पाणी निचरा व्यवस्था उभारण्याची कामे अपेक्षित वेगाने होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर विडी घरकूल परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा पावसाच्या पाण्यात दिवस काढावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment