वृक्षतोड प्रकरणी हरित लवादाकडे न्याय मागणार
बेकायदेशीर वृक्षतोडीची सखोल चौकशी करण्याची मागणी; भीमशक्ती संघटना आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीप्रकरणी संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भीमशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) न्याय मागणार असल्याची माहिती भीमशक्ती संघटनेचे प्रमुख सुबोध वाघमोडे यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस राजाभाऊ कदम, सलीम मुल्ला, नागेश गायकवाड, इब्राहिम शेख, समीर मुजावर, शशिकांत बेसूर, प्रमिला तुपलोंढे, ज्योती गायकवाड, हेमलता वाघमारे, राजश्री साबळे, सचिन साबळे, संदीप ससाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुबोध वाघमोडे यांनी सांगितले की, शहरातील संबंधित जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. मात्र, वृक्षतोडीपूर्वी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. असे असतानाही जमीनमालक किंवा बांधकाम व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
महापालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील हिरवळ नष्ट करून पर्यावरणाचा समतोल बिघडविणाऱ्या या प्रकारामुळे सोलापूरच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वृक्षतोडीमुळे शहराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी हरित लवादासह अन्य सक्षम प्राधिकरणांकडेही दाद मागण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment