शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना मोफत निवासासह निर्वाह भत्ता
राहण्याची सोय, मोफत वायफाय, भोजन व शैक्षणिक साहित्याचा लाभ; सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी शहरात राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या परिपत्रकानुसार सोलापूर जिल्ह्यातील १६ शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी, शेतमजूर तसेच मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.
वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचाही लाभ घेता येणार आहे. उच्च शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील वसतिगृहांची ठिकाणे
सोलापूर शहरासह अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, माढा, अकलूज आणि करमाळा येथे शासकीय वसतिगृहे उपलब्ध आहेत. वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा निवास व अन्य खर्च शासनामार्फत केला जातो.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, खुला, अपंग आणि अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत : ७ जुलै २०२६
इयत्ता ११ वी व १२ वी प्रवेशासाठी अंतिम मुदत : ३१ जुलै २०२६
उच्च व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अंतिम मुदत : १५ जुलै २०२६
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा
वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवासासह दोन वेळचे सकस भोजन, नाश्ता, दूध, फळे, अंडी तसेच आठवड्यातून दोन वेळा मांसाहारी भोजन दिले जाते. याशिवाय वह्या, पुस्तके, गणवेश, छत्री, रेनकोट, गमबूट, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
तसेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निर्वाह भत्ता जमा केला जातो, ही या योजनेची विशेष बाब आहे.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ८ वीपासून उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
"केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे," असे सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment