सोलापूरात अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडिया (CABI) यांच्या वतीने इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. ५ मे ते २१ मे दरम्यान पार पडलेल्या या शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागांतील २५ अंध महिला क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता.
समारोप कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंच्या जिद्द, आत्मविश्वास आणि क्रीडाप्रेमाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे टी-२० विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु. गंगा संभाजी कदम यांचा कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आलेला विशेष सत्कार. गंगा कदम यांच्या यशस्वी प्रवासाने उपस्थित प्रशिक्षणार्थी मुलींना प्रेरणा मिळाली.
यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेबर्सू, CABIच्या कु. राजश्री रमावत, राजू शेळके तसेच प्रशिक्षक व मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment