अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट शहरावर सध्या पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना स्टेशन रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण ज्या ठिकाणी केले जाते, त्याच परिसरातील रोलिंग रॅकवर चौकीदाराने धुतलेले कपडे वाळत घातल्याचे आढळून आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात सध्या १० ते १२ दिवसांआड प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. श्री स्वामी समर्थांची पवित्र नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकोटची लोकसंख्या ४० हजारांहून अधिक असून दररोज हजारो भाविक येथे येत असतात.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन जागतिक बँक आणि मुंफ्रा योजनेअंतर्गत सुमारे ७२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण विस्तार योजना सुरू आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था पाहता तेथील देखभाल आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, केंद्राची स्वच्छता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी असलेल्या चौकीदाराकडूनच अशा प्रकारची निष्काळजी कृती होत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याशी संबंधित ठिकाणी कपडे वाळत घालण्याचा प्रकार अत्यंत गैरजबाबदार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित चौकीदारावर कारवाई करण्यात यावी तसेच त्याची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची नियमित पाहणी करून व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment